Monday 25 July 2016

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका अठरा वर्षांवरील युवकांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका
अठरा वर्षांवरील युवकांच्या मतदार नोंदणीसाठी
महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित
----
जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीची गती वाढविली   
 
ठाणे दि २५: ठाणे, उल्हासनगर महानगरपालिकांच्या त्याचप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने युवकांच्या मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित केले असून आज ठाणा कॉलेज येथे १०० मुलांना प्रातिनिधिक स्वरुपात मतदार ओळखपत्रे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये युवकांची मतदार यादीत नोंदणी वाढविण्याचे निर्देश दिले होते.
युवक मतदारांची संख्या खूप कमी
काही ठिकाणी नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०१६ पूर्वी होणार आहेत तर ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि उल्हासनगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १८ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयांशी समन्वयाने नोंदणी मोहिमा आयोजित केल्या आहेत असे सांगून जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले कि, ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेले १८ ते २० वयोगटातील केवळ ५९ हजार ७२९ मतदार आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार ५६ लाख ४ हजार ७१५ इतकी असून त्या तुलनेत तरुण मतदारांची संख्या खूप कमी आहे. ही वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वाहन परवाना काढण्यापूर्वी मतदार ओळखपत्र आवश्यक
वाहन असो किवा नसो, वाहन परवाना काढण्यासाठी जितकी उत्सुकता आपण दाखवता तेवढी मतदानासारखा महत्वाचा राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी दाखविला पाहिजे असे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओची मदत घेऊन वाहन परवाना देण्यापूर्वी संबंधित युवकाकडे मतदार नोंदणी ओळखपत्र आहे का  याची खात्री करून घेण्याची संकल्पना राबवायचा विचार आहे असे सांगितले.
केवळ रहिवासी दाखला सदर करून किंवा महाविद्यालयाने निवाससंदर्भात दिलेले पत्र देखील नोंदीसाठी ग्राह्य धरले जाईल असे सांगून जिल्हाधिकार्यांनी मतदार ओल्कःपात्र मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभिमानाने ते त्यांच्या इतर मित्रांना दाखवून त्यांना देखील मतदार नोंदणी करण्यास प्रोत्साहन द्यावे असे सांगितले.
प्रारंभी उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी ओल्कःपात्र वाटपामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय मतदार  याद्या शुद्धीकरण कार्यक्रम १ मार्च २०१६ पासून सुरु झाला असून तो ३१ ऑगस्ट पर्यंत राबवायचा आहे. ईआरएमएस प्रणालीत अर्ज १६ भरल्यास ८ दिवसांत नोंदणी होऊन ओळखपत्र मिळू शकते असे सांगितले. ठाणे तहसील कार्यालय तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयांत मतदार नोंदणीसाठी नमुना ६ व ७ भारता येऊ शकेल अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या कि, १ जानेवारी २०१७ हा मानीव दिनांक असून यादिवशी ज्याला वयाची १८ र्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी नाव नोंदणी करावी. त्यांना नोंदणीची मदत करण्यासाठी १८ मध्यवर्ती केंद्र ठाण्यात तयार असून thaneelection.com किंवा ceo.maharashtra.gov.in यांच्या वेबसाईटवरून अधिक माहिती मिळू शकेल.
फोटो अपलोडिंगचे काम वेगात
जिल्ह्यात १८ विधानसभा मतदार संघात ५६ लाख ४ हजार ७१५ मतदार संख्या असून ४६ लाख ८ हजार ४४२ मतदार्नाचे फोरो अपलोडिंग झालेले आहे. महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी यांची मदत घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना देखील नोडल ऑफिसर तसेच कॅम्पस एम्बेसेडर म्हणून नेमण्यात येत आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुदाम परदेशी यांनी देखील मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जीवन गलांडे, विशेष भू संपादन अधिकारी माधव कुसेकर, तहसीलदार श्री भदाणे यांची उपस्थिती होती. तहसीलदार आसावरी संसारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.   

No comments:

Post a Comment