Saturday 3 December 2016

मुरबाडला रेल्वेने जोडण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
राज्य शासन खर्चाचा हिस्सा उचलणार
 
                                --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
 
ठाणे दि ३:  मुरबाड आणि परिसराचे महत्व लक्षात घेऊन या भागात देखील रेल्वेची कनेक्टीव्हिटी असणे गरजेचे आहे, त्यामुळे कल्याण-नगर रेल्वे मार्गाबाबत प्राधान्याने केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोलण्यात येईल त्याचप्रमाणे यासाठी येणाऱ्या खर्चात राज्य शासन आपला हिस्सा नक्की उचलेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरूपाच्या समाधान योजनेचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे मुरबाड येथे सुरु असलेल्या शासकीय योजनांची जत्राचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील,आमदार किसान कथोरे आमदार नरेंद्र पवार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख,  जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुरबाड तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच मुख्यमंत्र्यांनी जत्रेची पाहणी करून नागरिकांशी संवादही साधला.
महसूल विभागाच्या समाधान योजनेत राज्य शासन १ कोटी जनतेपर्यंत थेट पोहचले असून मुरबाडची ही शासकीय जत्रा अधिक नाविन्यपूर्ण असून यातील काही गोष्टी निश्चितच योजनेत समाविष्ट करून राज्यात राबविण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुरबाड येथे एम.एम.ए.हॉल परिसरातील मैदानावर आयोजित या जत्रेची संकल्पना आमदार किसान कथोरे यांची असून त्यांचे तसेच उत्तमरीत्या हा उपक्रम राबविल्या बद्धल जिल्हा प्रशासनाचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.  
 मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले कि, व्यवस्था अशी असली पाहिजे की सरकार जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. अशा लोकाभिमुख कार्यक्रमांतून सरकार किती पारदर्शी काम करतेय ते देखील दिसून येते.
शेतीला चांगले दिवस
जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे साडे सहा लाख एकर जमीन सिंचित झाली आणि ५०५ कोटी रुपयांची कामे लोकांचा सहभागातून झाली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वर्षे शेतीत आपली पीछेहाट होत होती. पण केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयांमुळे शेतीला चांगले दिवस येत आहेत . यंदा ७० ते ८० टक्के शेतमालाची आवक झाली असून शेतीचा विकास दरही दोन आकडी होऊ शकतो. अडचणी असल्या तरी मार्ग काढणे सुरु आहे असेही ते म्हणाले.
नवीन तहसील कार्यालयाचे कौतुक
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुरबाडच्या नव्या तहसील कार्यालय इमारतीचे उद्घाटन झाले . या इमारतीची रचनां आणि अंतर्गत व्यवस्था याचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले कि, आपल्याकडील सर्व रेकॉर्डरूम्स या अद्ययावत व्हावयास हव्या त्याचप्रमाणे मोबाईल आणि संगणकांच्या प्रणालीचा उत्तमोत्तम उपयोग करून घेतला पाहिजे.
नागरिकाना विहित मुदतीत सेवा मिळण्याचा हक्क आहे त्यामुळे कुठलेही वजन न ठेवता फिजिकल नव्हे तर डिजिटल सेवा नागरिकांना मिळालीच पाहिजे.
गरीब कल्याण कोषातून योजनांसाठी निधी
पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या चलन बंदीच्या निर्णयामुळे एकीकडे दहशतवादी, नक्षलवादी यांच्याकडील पैशाचा ओघ संपला तर दुसरीकडे पाकिस्ताना मधून येणाऱ्या नकली नोटा बंद झाल्या. आपल्या देशात हजारो कोटी रुपये दाबून ठेवलेल्या लोकांना धडा मिळाला. देशाच्या बँकेत १० लाख कोटी रुपये जमा झाले हे पैसे गरीब कल्याण कोषात जाऊन यातून गरिबांच्या कल्याणाच्या योजना राबविण्यात येतील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, भविष्यात आपल्याला कॅशलेस व्यवस्था निर्माण करायची आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनधन योजना, मुद्रा योजना, उज्वला योजना या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात कसे परिवर्तन घडते आहे ते सांगितले.
शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या ज्ञान केंद्र होतील अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करीत असून २५ हजार शाळा डिजिटल झाल्याचे सांगितले.
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा श्रीमंतांना समृध्द करण्यासाठी नसून गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांना आम्ही या प्रकल्पात भागीदार करून त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने बदलवून टाकणार आहे असेही ते म्हणाले.   
यावेळी बोलतांना आमदार किसान कथोरे यांनी या शासकीय योजनाच्या जत्रेमागची संकल्पना सांगितली तसेच स्व. शांताराम घोलप यांचे स्मारक व्हावे, मुरबाडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, एमएमआरडीएच्या कामांचा मुरबाडला फायदा व्हावा, नगरपंचायतीला सक्षम करावे अशा मागण्या केल्या.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला मोठ्या धरणाची आवश्यकता आहे असे सांगून समृद्धी महामार्गाची जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने निभावू अशी ग्वाही दिली. खासदार कपिल पाटील यांचीही भाषण झाले. कोकण रेल्वेप्रमाणे रो रो ही मालवाहतुकीसाठी सेवा ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी भागात सुरु झाल्यास वाहतुकीचे प्रश्न सुटतील असे ते म्हणले.         
विविध उपक्रमांत जिल्ह्याची चांगली कामगिरी
 जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी आपल्या भाषणात वनहक्क दावे मोठ्या प्रमाणावार मान्य करून आदिवासींना कसण्याचा हक्क दिला असे सांगितले. कातकरी कुटुंबांचे हेल्थ कार्ड या जत्रेत तयार करण्यात आले त्याचप्रमाणे आजपर्यंत कोणतेही लाभ न घेतलेल्या कुटुंबाना विविध दाखले व प्रमाणपत्रे दिल्याचेही ते म्हणाले. मुद्रा योजना कर्ज वाटप, वृक्षारोपण, जलयुक्त  यासारख्या महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्ह्याने चांगली कामगिरी करून दाखविली असल्याचे सांगितले.
शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.  
 

No comments:

Post a Comment