Thursday 29 September 2016

अधिकाऱ्यांनी फ्लॅगशीप योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास
व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन होईल
                                              --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
------------------------------
कोकण विभागातील कामांविषयी समाधानी
 
ठाणे दि २९: अधिकाऱ्यांनी फ्लॅगशीप योजनांची अंमलबजावणी करतांना आपल्या कामामुळे समाजाचे, गावाचे आणि आपल्या परिसराचे भले होणार आहे अशी आपलेपणाची भावना ठेऊन गुणात्मक काम केल्यास व्यवस्थेत तात्काळ परिवर्तन दिसून येईल या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोकण विभागाच्या आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कोकण विभागाने या योजनाच्या अंमलबजावणीत चांगले काम केले असून पुढे आणखीही उत्तम काम करून राज्यात अव्वल क्रमांक मिळवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले, राज्यातील पहिला हागणदारीमुक्त विभाग होण्याची चांगली संधी कोकण विभागाला आहे. २०१७ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांनी हे साध्य करावे. जलयुक्त शिवार उपक्रमात ज्याप्रमाणे सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केले त्याप्रमाणे स्वच्छ महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वांनी समन्वयाने काम करावे. २०२२ पर्यंत आपणास सर्वाना घरे द्यायची आहेत. २०१९ पर्यंत सर्व अनुसूचित जाती व जमातीच्या घटकांना पक्की घरी द्यायची आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणले की मागे राहिलेल्या तालुक्यांना पुढे आणणे महत्वाचे असून अधिकाऱ्यांनी उत्तरदायित्व स्वीकारून काम करावे. यामध्ये जबाबदरी वाढेल पण एकदा व्यवस्था निर्माण झाली सर्व कामे ऑटो पायलट मोडमध्ये होतील. आपण नोकरीत जितके दिवस आहोत तितके दिवस पूर्ण क्षमतेने काम करूत ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
आधार सीडिंग झालेच पाहिजे
 
मनरेगा कामांमध्ये लवचिकता यावी यासाठी ६०:४० हे तत्व जिल्हा स्तरावर लागू करण्यात आले आहे . ठाणे, पालघर आणि रायगड येथे भाजीपाला लागवडीस प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक योजनेचे आधार सीडिंग झालेच पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
कोकणात शेततळी
 
कोकणात ५० टक्के पैसेवारीची अट न ठेवता शेततळ्यांना मंजुरी देणार . मागेल त्याला शेत तळे उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.            
यावेळी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी विविध योजनांच्या कामांचे सादरीकरण केले. यामध्ये जलयुक्त शिवार, मनरेगा, कृषी पंपांची जोडणी, स्वच्छ भारत ग्रामीण, स्वच्छ महाराष्ट्र नागरी,प्रधानमंत्री अववास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, सेवा हमी कायदा, खरीप पिक कर्ज, एडीट मोड्युल, ई फेरफार, फळबाग लागवड, एक दिवस शाळेसाठी, सामाजिक न्यायाच्या योजना यांचा समावेश होता.
 
जलयुक्त शिवार ३८८ कामे पूर्ण
 
जलयुक्त शिवार योजनेत १३६ गावांमधून ३८८ कामे पूर्ण झाले असून ६ कोटी ११ लाख रुपये खर्च झाला आहे
 
मनरेगा सिंचन विहिरी
मनरेगा सिंचन विहिरीच्या कामात ३ हजार ३३७ विहिरी पूर्ण झाल्या असून चालू वर्षी उद्दिष्टांपेक्षा जास्त १७६ टक्के काम झाले आहे
 
कृषी पंपांची जोडणी
 
कोकण विभागात १ हजार ९१० कृषी पंपाना विद्युत  जोडणी देण्यात आली असून ३ हजार ९३५ जोडण्या देणे शिल्लक आहे.
 
वैयक्तिक शौचालय प्रगती ८३%
 
वैयक्तिक शौचालय बांधण्यात राज्याने ६२ टक्के तर विभागाने ८३ टक्के प्रगती केली आहे. ११ लाख ५६ हजार कुटुंबाना वैयक्तिक शौचालये मिळाली आहेत
 
६४ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
 
कोकण विभागात ६४ टक्के ग्राम पंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. या वर्षी १९२९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या. विभगातील एकूण २८ शहरे हागणदारीमुक्त करण्यात येत आहे.
 
प्रधानमंत्री आवास योजनेची प्रगती
प्रधानमंत्री आवास योजनेत १३ हजार ९९७ प्रकरणांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असून ९१ टक्के लोकांना पहिल्या हप्त्याचे वितरण आणि ३२ टक्के जणांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
रमाई आवास योजनेत ५६.३३ टक्के घरकुले बांधून पूर्ण झाली तर शबरी घरकुल योजनेत उद्दिष्टांपेक्षा जास्त ३ हजार ६५४ प्रस्ताव मान्य झाले.
 
सेवा हमी कायदा ९९ टक्के अंमलबजावणी
 
सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीत ९९ टक्के अर्जांचा निपटारा झाला. तर २२६ ठिकाणी वर्क स्टेशन्स सुरु करण्यात आली.
 
आधार सीडिंग ८० टक्के
 
विभगात ८० टक्के लाभार्थीचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे तर ५१ टक्के जणांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे.
 
फळबाग लागवड
 
कोकण विभागात सध्या मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन फळबाग लागवडीखाली आणण्यासाठी वाव असल्याने रोहयो व मनरेगा योजनेत फळबाग लागवड क्षेत्र वाढविण्यात येत आहे.
 
१० हजारापेक्षा जास्त शाळांना भेटी
 
एक दिवस शाळेचा उपक्रमात १० हजार १२० शाळांना ३ हजार ६८२ अधिकारी व ३२८ लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगडची जलक्रांती – एक प्रयत्न या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुस्तिकेचे तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सबला या महिला सक्षमीकरण या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लोकराज्य अभियान संस्थेचे सादरीकरणही करण्यात आले. शेवटी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी आभार मानले.
 
मोबाईल एपचा शुभारंभ
 
याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ठाणे सहज मोबाईल एपचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, सिंधुदुर्गचे  पालकमंत्री दिपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी तसेच प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, राजेशकुमार मीना, बिपीनकुमार श्रीमाळी, , राजगोपाल देवरा, सुरेंद्र बागडेडॉ. असिम गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment