Saturday, 28 February 2026

हिंद-दी-चादर’ समागमात भव्य लंगर व्यवस्था लाखो भाविकांनी घेतला लंगर सेवेचा लाभ

 

 

 नवी मुंबई, दि. २८ : हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी लंगर सेवेचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापन सुरळीत पार पडत आहे.

    स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणे, वाढप, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जात आहे.

लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले असून ‘सेवा’ हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

  या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून वाहे गुरु व बोले सो निहाल सत श्री अकाल च्या जयघोषात भाविक दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत आहेत.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

00000

खारघर येथे “हिंद-दी-चादर” शहीदी समागमात भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संगम


 

नवी मुंबई,दि.२८ :खारघर नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळत आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.

समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून वाहे गुरु आणि बोले सो निहाल, सत श्री अकाल च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. रागी जत्थेदारांच्या कीर्तनात भाविक भावनिकरित्या तल्लीन झालेले दिसत होते. विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी स्क्रीनमुळे प्रत्येक भाविकाला कीर्तनाचा लाभ घेता आला.

विरासत-ए-सीख या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शौर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. शीख योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे. हजारो स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘सेवा हीच खरी श्रद्धा हा संदेश  दिला जात आहे.

समागमात मुख्यमंत्री सहायता निधी च्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डोळ्यांची तपासणी करून मोफत देवाभाऊ चष्मे वाहनातून चष्मे  वितरित करण्याची सोयही करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.

 शिखांची पारंपरिक मार्शल आर्ट ची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली.३३ पार्किंग स्थळे, मोफत पिकअप-ड्रॉप सुविधा, कडक वाहतूक नियोजन, पोलीस व अग्निशामक दलाचा बंदोबस्त यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.

एकंदरीत, श्री गुरु तेग बहादूर यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ आयोजित हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरत आहे.

 

00000

हिंद-दी-चादर कार्यक्रमात भाविकांसाठी प्रशासनाच्या सर्व सोयी–सुविधा उपलब्ध

 

नवी मुंबई, दि. २८ :  भव्य समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, स्वच्छता व पायाभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन  करण्यात आले आहे.

भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक मार्गयोजना आखण्यात आली असून, पोलीस विभागामार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला  आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सायबर पोलीस व एटीएस यांचीही मदत घेण्यात आली आहे.

आरोग्य सेवांच्या दृष्टीने कार्यक्रमस्थळी  तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व १ आयसीयू उभारण्यात येणार असून, जवळील रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एकूण १०० पेक्षा अधिक डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहणार आहेत.

ओवे मैदानाची एकावेळी सुमारे ५ लाख भाविकांची क्षमता असून, मुख्य मंडपात ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात असून, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, प्रकाशयोजना व स्वच्छतागृहांची कामे प्रगतीपथावर आहेत. १ हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि ५०० पेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.

देशभरातून भाविक येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी ३० पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जेएनपीए परिसरात दररोज होणाऱ्या सुमारे २५ हजार जड वाहनांच्या ये-जा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ३८ स्वतंत्र पार्किंग स्थळे, ३ हेलिपॅड, २५ हजार भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

लंगर व्यवस्थेसाठी सुमारे १ हजार गॅस सिलेंडर, आवश्यक इंधन व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत

https://gurutegbahadurshahidi.com/home संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

00000

Tuesday, 14 August 2018

राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते
कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

            नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य  दिनाचा 71  वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे साजरा झाला. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण झाले. 
            या समारंभाप्रसंगी आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, कोकण विभागीय महसूल आयुक्त  डॉ.जगदीश पाटील,  नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.रामास्वामी एनपनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.गणेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान श्रीमती आर.विमला,  नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.संजय कुमार, संचालक लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन, नवी मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.सुरेशकुमार मेकला आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी नवी मुंबई पोलीस पथक, सीबीडी- बेलापूर येथील भारती विद्यापीठ, ज्ञानपुष्प विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
            विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते सॅनिटरी पॅड व्हेन्डींग व डिस्पोजल मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीनचे व्यवस्थापन श्रीकृपा स्वंयसहायता बचतगटाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
          यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री.महेंद्र वारभुवन, उप आयुक्त (महसूल) श्री. सिध्दाराम सालीमठ, उपायुक्त (रोहयो)श्री.अशोक पाटील,  उपायुक्त (पुर्नवसन) श्री.अरुण अभंग, उपायुक्त (पुरवठा) श्री.दिलीप गुट्टे,  उपायुक्त (विकास) श्री.भारत शेंडगे, उपायुक्त (आस्थापना) श्री.गणेश चौधरी तसेच शासकीय अधिकारीकर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचेसूत्रसंचलन निंबाजी गिते यांनी  केले.



Saturday, 1 July 2017


जल, जंगल, जमिनीचे संवर्धनावर शासनाचा भर

मुख्यमंत्री फडणवीस यांचा जनसेवकांशी प्रेरणादायी संवाद

नवी मुंबई, दि.1- राज्य शासनाने काम करतांना ‘जल जमीन आणि जंगल’ यांच्या संवर्धनावर भर दिला आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवून पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे, 50 कोटी वृक्ष लागवड  करुन सध्या 21 टक्क्यांवर असलेले वृक्षाच्छादन 33 टक्क्यांवर नेणे तसेच गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार हे अभियान राबवून वाहून जाणारी माती अडविणे या तीन प्रमुख योजनांवर शासन काम करीत आहे. ज्यामुळे आपण आपल्या नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करु शकू, असा विश्वास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 ऐरोली येथे अनुलोम  संस्थेच्या  राज्यस्तरीय अनुलोम संगम कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या जनसेवकांशी श्री. फडणवीस यांनी आज संवाद साधला. ऐरोली सेक्टर 17 मधील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात  अनुलोम जनसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु आहे. यावेळी अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, मुख्य माहिती अधिकारी स्वानंद ओक, विजय पुराणिक तसेच कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रशासन अजय अंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसेवकांचा सत्कार करण्यात आला. अनुलोम तर्फे तयार करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहिती पुस्तिकेचे व लाभार्थी आभार पत्र स्टिकरचे विमोचनही करण्यात आले.

 यावेळी बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले की, शासन जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना बनवतं परंतू त्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या व्यवस्थेतील दोष दुर करुन ती अधिक प्रभावी पणे  जनतेपर्यंत नेण्यासाठी अनुलोम सारख्या सकारात्मक विचारांनी कार्य करणाऱ्या संघटनेचे महत्व खूप आहे. म्हणूनच अनुलोमच्या जनसेवकांनी शासन आणि जनता यांच्यातील दुवा व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            श्री. फडणवीस म्हणाले की, सकारात्मक विचारांनी  शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारी अनुलोम ही देशातील एकमेव संस्था आहे. अराजकीय विचारांनी हे काम सेवा भावनेने करणे हे महत्त्वाचे आहे.  म्हणूनच अनुलोमच्या जनसेवकांनी शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले की, कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असूनही अदृश्य असते.

 कोणतेही काम करतांना त्या कामामागील प्रेरणा काय आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. शासकीय योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ही प्रेरणा महत्त्वाचे काम करते.  कुणाच्याही जीवनात सकारात्मक परिवर्तन करणे ही असेल तर ते अधिकारी उत्तम काम करतात. काम करण्यातली सामाजिक बांधिलकी ही वेगळ्या प्रेरणेने येत नाही. त्यामुळे ही प्रेरणा निर्माण करण्यातली दरी भरुन काढण्याचे काम अनुलोम मार्फत व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सामाजिक बांधीलकीची प्रेरणा हीच सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. यासाठी त्यांनी गॅस सबसिडी सोडण्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा दाखला दिला.  त्यामुळे सबसिडी सोडणाऱ्या वर्गाला प्रेरणा मिळाली. आणि अनेकांना गॅस कनेक्शनही मिळाले.

 क्षेत्र कोणतेही असो तेथे काम करणारा कार्यकर्ता हा ‘लीडर’ असतो.  अशा सेवाभावी क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आज आहे. काम केल्यानंतर कामाबद्दल होणाऱ्या प्रशंसेने अहंकाराचा लवलेषही होऊ देऊ नका , अशी सुचनाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.

राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना ते म्हणाले की, ही योजना आखतांना शेतकऱ्यालाच त्याचा फायदा व्हावा, असेच शासनाचे धोरण आहे. अनुलोम च्या कार्यकर्त्यांनी या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्वानंद ओक यांनी केले. यावेळी राज्यभरातील अनुलोम जनसेवक उपस्थित होते.


ऐरोली येथे वृक्षारोपणाच्या राज्यस्तरीय महामोहिमेचा शुभारंभ
जल, जंगल आणि जमिनीची अवस्था सुधारण्यासाठी राज्य शासनाची ठोस पाऊले;
नदी बचाव मोहिमेत राज्य सहभागी होणार
                                                        – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे दि १: जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज त्यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,आदींची उपस्थिती होती.
ऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण या राज्य पुष्पाचे रोपटे, तर नितीन गडकरी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपळ, तर सुधीर मूनगंटीवार आणि सद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या हस्ते कडुलिंबाचे रोपटे लावण्यात आले. यावेळी मुसळधार पाउस सुरु असतांना देखील उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिक यांचा रोपे लावण्याचा उत्साह कमी झाला नव्हता. 
 
नदी बचाव मोहिमेतही सहभागी होणार
जग्गी वासुदेवजी यांनी नदी बचाव मोहिमेची देशव्यापी सुरुवात केली असून महाराष्ट्र देखील या मोहिमेत आघाडीवर असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, सुधीरभाऊंनी झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील वनांचे आच्छादन ३३ टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असतांना अडीच कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.         वनविभागाच्या वृक्षारोपणाकडे पूर्वी जुन्याच खड्यांमध्ये नवी रोपे लावतात असे उपरोधाने म्हटले जायचे, पण वनविभागाने कात टाकली असून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. खड्डे खोद्ण्यापासून ते रोपे लावणे आणि ते जगविणे या सर्वांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते. प्रत्येक रोपांचे जिओ टॅगिंग केले जात आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळ्मुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अनुकरण देशभर व्हावे
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वन विभागाच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अतिशय कमी कालावधीत नियोजनबध्द पद्धतीने हाती घेतलेल्या या मोहिमेचे अनुकरण देशभर इतर राज्यांनी देखील करावे.देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले.
आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणारया ५५ बसेस सुरु केल्या आहेत. देशात अगरबत्तीच्या व्यवसायासाठी ४० हजार कोटीचे लाकूड आयात होत असून ४ हजार कोटीच्या काड्या आयात होतात, पण आता गडचिरोली येथे सुधीरभाऊनी अगरबत्ती उत्पादनासाठी तेथीलच जंगलातील बांबू व इतर लाकूड याचा उपयोग करुन क्लस्टर सुरु केले आहे त्याचा निश्चितच फायदा स्थानिक उद्योगाला होईल. बांबूचा देखील चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो असे ते म्हणाले.
  जग्गी वासुदेवजी यांनी देखील या मोहिमेची प्रशंसा करून आपल्या नदी बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

राज्य ३३ टक्के हरित करणारच
प्रारंभी वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावूत अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या राज्यात २० टक्यांपेक्षा देखील कमी हरित क्षेत्र आहे. पण या मोहिमेनंतर हे हरित क्षेत्र वाढून ३३ टक्के होणारच. ऐरोली येथील हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दृष्टिहीन शाळकरी मुलांनी उत्साहात रोपे लावली त्याचा उल्लेखही त्यांनी केला. १६ कोटी ६० लाख रोपटी आत्ता नर्सरीत तयार आहेत असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जग्गी वासुदेवजी यांच्या ईशा फौन्डेशन समवेत वृक्षारोपणाचा करार करण्यात आला. विश्वस्त कृष्णा अरुप, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान
याप्रसंगी सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगोलीतील आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आले.
माहितीपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन
याप्रसंगी महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

बायकर्स रॅली
यावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बायकर्स रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. २२ बायकर्स हे वृक्षारोपणाचा संदेश देत राज्यातील जिल्ह्यांतून फिरणार असून ७ तारखेस ठाणे येथे समारोप होणार आहे.
आजच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, गणपत गायकवाड, मुख्य सचिव सुमित मल्लिक, श्रीमती सपना मुनगंटीवार, महापौर सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.
वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी यावेळी आभार मानले.




Wednesday, 19 April 2017

यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेंटरचे नवी मुंबईत उद्घाटन
वित्तीय सेवा देणाऱ्या यूबीएस कंपनीच्या
 विस्तारीकरणातही राज्य शासनाचे सहकार्य
                                         --मुख्यमंत्री  
 
ठाणे दि १९: जगभरातील उद्योग, संस्था यांना वित्तीय सल्ला देणाऱ्या तसेच संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनात अग्रणी अशा यूबीएस कंपनीच्या बिझिनेस सोल्युशन सेंटरचे कार्यालय आता पुण्यापाठोपाठ मुंबईत सुरु होत आहे ही आनंदाची बाब असून या नामांकित कंपनीने मुंबई आणि महाराष्ट्रात अधिक विस्तार करण्याचे ठरविल्यास आपण स्वागतच करूत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज ऐरोली नॉलेज पार्क येथे यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेन्टरचे उद्घाटन करतांना बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, इथे हे सेंटर सुरु होणे म्हणजे पुण्यासारख्या आय टी हब पासून मुंबईसारख्या देशाच्या फायनान्शियल हबकडे केलेला हा प्रवास आहे असे मी समजतो. याठिकाणी देशाच्या वित्तीय राजधानीत संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनास मोठा वाव असून तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यूबीएसने सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून राज्यातील काही शाळांमधून डिजिटल शाळेचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे त्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले तसेच कंपनीच्या संपूर्ण जागतिक विस्तारीकरणात महाराष्ट्राचे तुम्हाला सहकार्य राहील असेही सांगितले.
प्रारंभी कंपनीचे ग्रुप व्यवस्थापकीय संचालक एक्सेल लेहमन यांनी आपल्या प्रास्ताविकात मुंबईसारख्या वित्तीय घडामोडीच्या शहरांत कंपनीचे केंद्र सुरु करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. सध्या ३०० कर्मचारी याठिकाणी काम करणार आहेत असेही ते म्हणाले. संपूर्ण भारतात ११ हजार कर्मचारी काम करीत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई आणि महाराष्ट्रातील तंत्र कुशल मनुष्यबळ, शैक्षणिक सोयी सुविधा, प्रचंड संधी आणि उद्योग स्नेही वातावरण यांचा विचार करून कंपनीने मुंबईत हे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.     
यूबीएस ही गेल्या १५० वर्षांपासून जगभरातील विविध उद्योग,संस्था यांना वित्तीय सेवा पुरवीत आहे. झुरीच, स्वित्झर्लंड येथे या कंपनीचे मुख्यालय असून जगभरातील सर्व प्रमुख वित्तीय केंद्रांच्या ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत. यूबीएसची बिझिनेस सोल्युशन सेंटर्स ही बँकेच्या नेटवर्कमध्ये आपली सेवा देत असतात.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सेंटरची पाहणी करून विविध कामांची माहिती करून घेतली तसेच अचानकपणे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या त्यांच्या कृतीमुळे कर्मचाऱ्यांनी  टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.