Saturday 15 October 2016


नाणीज संस्थांनच्या भक्तगणांचा मरणोत्तर देहदान संकल्प विश्वविक्रमी

                                                          - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी दि.15  (जिमाका) :- भारतीय संस्कृतीत त्यागाच्या भावनेला अनन्यसाधारण असे महत्व आहे.  या त्यागाच्या भावनेतून दुसऱ्याचे आयुष्य सुखमय व्हावे या उद्देशाने नाणीज संस्थांनच्या 56 हजार 537 भक्त गणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.  हा विश्वविक्रम असू शकतो  सामाजिक बांधिलकेच्या जाणीवेतून तसेच भेदभाव रहित समाज निर्मितीसाठी अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे हे कार्य आदर्शवत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणीज ता. रत्नागिरी येथे आयोजित समारंभात सांगितले.

          नाणीज येथील श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या सुंदरगडावरील संत पीठावर आयोजित मरणोत्तर देहदान संकल्पपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहेर, पालकमंत्री रविंद्र वायकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विनायक राऊत, खासदार नानासाहेब पटोले आदी मान्यवर उपस्थित होते. 

          शासनामार्फत महा अवयवदान अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात आल.   या अभियानास बराचसा प्रतिसाद मिळाला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  पण समाज अशा लोकोपयोगी अभियानाच्या मागे उभा राहिला तर चमत्कार घडत.  नाणीज संस्थानच्या भक्तगणांनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विश्वविक्रमी संख्यने मरणोत्तर देहदान या अभियानाचा संकल्प केला.  धर्मसत्तेने त्यागाची भावना जोपासून केलेले कार्य हे इतरांना मार्गदर्शक ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमास येणार होते.  तथापि सहा देशांच्या ब्रिक्स परिषदेमुळे त्यांना येता आले नाही. 

          एका देहदानामुळे दहा डॉक्टर शिक्षण घेवू शकतात त्याही पेक्षा एका देहदानातून इतर रुग्णांना आवश्यक असलेले नऊ प्रकारचे अवयव उपलब्ध होवू शकतात असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, दरवर्षी 5 लक्ष रुग्णांना विविध अवयवयांची गरज असते पण प्रत्यक्षात 5 हजार रुग्णांनाच अवयव उपलब्ध होतात.  हे व्यस्त प्रमाण पाहिले तर अवयवदाना संदर्भात इतर संस्थानीही जागरुकतेने कार्य करण्याची आज नितांत गरज आहे. 

          तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगवा या जगतगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या बोधानुसार नाणी संस्थानचे भक्त गणांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, शिक्षण, रोजगार, संस्कृती, रक्तदान, देहदान आदी क्षेत्रात महाराजांनी उत्तुंग कार्य केले आहे.  महाराजांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. 

          मरणोत्तर देहदान करणाऱ्या सौ. मंदाकिनी पांडे, पार्वती जाधव यांच्या नातेवाईकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.  देहदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तीपैकी प्रातिनीधीक स्वरुपात शिवाजी घाटे, प्रमोद घरड, सुरेंद्र सोहनी, कुणाल झाडे, भूपेंद्र नेवाळे या भक्तगणांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी ओळखपत्र वितरीत करण्यात आली.  नाणी संस्थांनच्या कार्याचा परिचय करुन देणारा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. 

          विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, नाणी संस्थानने समाजोपयेागी कामांचा डोंगर उभा करुनच इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.  सध्याच्या परिस्थितीत गरजूंना शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.  या दृष्टीकोनातून गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे शिक्षणाची सुविधा निर्माण करण्याचे काम सामाजिक संस्थांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतनही त्यांनी यावेळी केले. 

          केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसंराज अहिर यांनी नाणी संस्थांनच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन याप्रसंगी बोलताना म्हणाले की, समाजाच्या उत्कर्षाप्रती सामाजिक गरजा पूर्ण करण्याचे हे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.  धार्मिक अध्यात्मिक कार्याबरोबरच श्री स्वामी नरेंद्राचार्यांनी समाजसेवेच हे व्रत अविरत सुरु ठेवले आहे हे अनुकरणीय आहे. 

          पालकमंत्री रविंद्र वायकर या प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा या संतवचनाचा उल्लेख करुन श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजाच्या सर्वांगिण उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांचे हे कार्य अलौकिक आहे.  मानव जातीतील विषमता दूर करणे, तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा या उद्देशाने विविध उपक्रम अव्याहतपणे सुरु ठेवणे, रक्तदान, मरणोत्तर देहदान याबाबत विक्रमी संख्येने सहभाग नोंदविणे यालाच ईश्वर सेवा म्हणतात हे सर्व भक्त गणांवर बिंबवून समाजाची सेवा करण्याचे महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे इतरांना मार्गदर्शक आहे. 

          श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.  शेवटी नाणी संस्थानचे श्री कनिफनाथ महाराज यांनी आभार प्रदर्शन केले.  यावेळी आमदार सर्वश्री उदय सामंत, सुधाकर भालेराव, राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, माजी आमदार सर्वश्री सुरेंद्र माने, सुभाष बने, रविंद्र माने, विनय नातू, सूर्यकांत दळवी तसेच देशातील व राज्यातील नाणीज संस्थानचे भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते.