Wednesday 19 April 2017

यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेंटरचे नवी मुंबईत उद्घाटन
वित्तीय सेवा देणाऱ्या यूबीएस कंपनीच्या
 विस्तारीकरणातही राज्य शासनाचे सहकार्य
                                         --मुख्यमंत्री  
 
ठाणे दि १९: जगभरातील उद्योग, संस्था यांना वित्तीय सल्ला देणाऱ्या तसेच संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनात अग्रणी अशा यूबीएस कंपनीच्या बिझिनेस सोल्युशन सेंटरचे कार्यालय आता पुण्यापाठोपाठ मुंबईत सुरु होत आहे ही आनंदाची बाब असून या नामांकित कंपनीने मुंबई आणि महाराष्ट्रात अधिक विस्तार करण्याचे ठरविल्यास आपण स्वागतच करूत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज ऐरोली नॉलेज पार्क येथे यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेन्टरचे उद्घाटन करतांना बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, इथे हे सेंटर सुरु होणे म्हणजे पुण्यासारख्या आय टी हब पासून मुंबईसारख्या देशाच्या फायनान्शियल हबकडे केलेला हा प्रवास आहे असे मी समजतो. याठिकाणी देशाच्या वित्तीय राजधानीत संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनास मोठा वाव असून तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यूबीएसने सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून राज्यातील काही शाळांमधून डिजिटल शाळेचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे त्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले तसेच कंपनीच्या संपूर्ण जागतिक विस्तारीकरणात महाराष्ट्राचे तुम्हाला सहकार्य राहील असेही सांगितले.
प्रारंभी कंपनीचे ग्रुप व्यवस्थापकीय संचालक एक्सेल लेहमन यांनी आपल्या प्रास्ताविकात मुंबईसारख्या वित्तीय घडामोडीच्या शहरांत कंपनीचे केंद्र सुरु करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. सध्या ३०० कर्मचारी याठिकाणी काम करणार आहेत असेही ते म्हणाले. संपूर्ण भारतात ११ हजार कर्मचारी काम करीत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई आणि महाराष्ट्रातील तंत्र कुशल मनुष्यबळ, शैक्षणिक सोयी सुविधा, प्रचंड संधी आणि उद्योग स्नेही वातावरण यांचा विचार करून कंपनीने मुंबईत हे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.     
यूबीएस ही गेल्या १५० वर्षांपासून जगभरातील विविध उद्योग,संस्था यांना वित्तीय सेवा पुरवीत आहे. झुरीच, स्वित्झर्लंड येथे या कंपनीचे मुख्यालय असून जगभरातील सर्व प्रमुख वित्तीय केंद्रांच्या ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत. यूबीएसची बिझिनेस सोल्युशन सेंटर्स ही बँकेच्या नेटवर्कमध्ये आपली सेवा देत असतात.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सेंटरची पाहणी करून विविध कामांची माहिती करून घेतली तसेच अचानकपणे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या त्यांच्या कृतीमुळे कर्मचाऱ्यांनी  टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.



Saturday 8 April 2017

वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाच्या ४ मार्गिका वाहतुकीस खुल्या

भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करणार – मुख्यमंत्री

ठाणे दि ८: भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले असून याठिकाणी अद्ययावत लॉजीस्टिक पार्क, दळणवळणाच्या सोयी सुविधा असतील तसेच १० लाख लोकांना रोजगारही मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवंडी माणकोली येथे सांगितले. ते आज माणकोली नाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गीकेचे उद्घाटन करतांना बोलत होते. या उड्डाणपुलामुळे ठाणे नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला बांधलेली फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला.
भिवंडी परिसराच्या सर्वांगीण कायापालटाचे नियोजन स्पष्ट करतांना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येईल असे टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारच्या काळात तसाच पडून होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला जोरदार गती दिली आणि काही महिन्यातच बदल दिसू लागला. याठिकाणी ९८५ कोटींचे विविध विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागातील ६० गावांमध्ये देशातील एक उत्तम लॉजीस्टिक पार्क उभारण्यात येईल. याठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी , इतर आवश्यक पायाभूत सुविधा असतील. संपूर्ण देशाच्या लॉजीस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्शविकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठीची जमीन घेणे या गोष्टी तातडीने सुरु करण्याचे निर्देशच त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांना दिले. यासाठी कुठल्याही प्रकारे निधी कामू पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी आश्वस्त केले.

एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था

केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य द्यावयाचे ठरविले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या १० वर्षात १० किमी मेट्रोचे कामही झाले नव्हते ते आम्ही २ वर्षांत प्रत्यक्ष १२० किमीचे काम सुरूही झाले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागात ५५९ कोटींचे ५ उड्डाणपूल बनविण्यात येत आहेत . नजीकच्या काळात वंजारपट्टी, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडी, माणकोली- मोटा गाव अशा या वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल.
मेट्रोमुळे कसा फरक पडतोय हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, २ कोटी मोठ्या झाडांमुळे जितके कार्बन फूट प्रिंट कमी होतील तितके कार्बन फूट प्रिंट मेट्रोच्या मार्गांमुळे कमी होतील त्यामुळे पर्य्वारणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली एकात्मिक रीतीने विकसित करण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई- ठाणे-कल्याण-भिवंडी- भाईंदर अशी एकात्मिक आणि सर्क्युलर वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, त्यामुळे एमएमआरमधली सगळी छोटी मोठी शहरे जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिले आहे.

कामे वेगवान पद्धतीने व्हावीत

आपल्या भाषणात एक खुसखुशीत टिपणी करतांना मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, आमच्याकडे आता पुढची दोन अडीच वर्षे आहेत त्यामुळे आमची सर्व कामे आम्हाला त्यात आटोपायची आहेत. आमच्या दृष्टीने वेगाला प्राधान्य आहे. तुम्ही निवृत्तीपर्यंत इथे राहाल पण आम्हाला जनतेला कामे दाखवायची आहेत.

वर्सोवा पुलासाठीही बैठक घ्या- पालकमंत्री

प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार कपिल पाटील यांनी भाषणे केली. पालकमंत्री म्हणाले की, वर्सोवा पुलाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गासह सर्व संबंधिताना निर्देश द्यावेत म्हणजे काम वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. तळोजा पर्यंत आलेली मेट्रो कल्याणपर्यंत आणावी अशी सूचनाही त्यांनी केली.
खासदार कपिल पाटील म्हणाले की, या क्षेत्रातील ३४ गावांमध्ये पिण्याच्या पण्याची समस्या सुटणे गरजेचे आहे. अजूनही या ठिकाणी केवळ ८ एमएलडी पाणी पुरविले जाते. भिवंडी हे नवी मुंबईसारखे नियोजनबध्द शहर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.  आयुक्त मदान यांनी या पुलांमुळे वाहतुकीवरील ताण कसा दूर होणार आहे ते सांगितले.
 राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शांताराम मोरे, किसान कथोरे, महेश चौगुले, गणपत गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, भिवंडी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

असा आहे हा उड्डाणपूल

आज उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या ४ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. याची लांबी ६५०.३३ मीटर इतकी असून उर्वरित ४ मार्गिकांचे काम सुरु आहे. हा उड्डाणपूल माणकोली नाक्यावर असून दुसरा पूल भिवंडी कल्याण जंक्शन येथे असेल. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने याचे बांधकाम केले आहे. दोन्ही उद्दन्पुलन्चा खर्च सुमारे १२१ कोटी इतका असेल. या मार्गिका खुल्या केल्यामुळे माणकोली नाका येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी दूर होईल. पुलाचे बांधकाम करतांना स्टेमच्या पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स, बीपीसीएलच्या लाईन्स तसेच आसपासची दुकाने व इतर बाबींमुळे पुलाचे काम मध्यंतरीच्या काळात रखडले होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Saturday 1 April 2017

देशातील यंत्रमागाला संजीवनी देणाऱ्या पॉवरटेक्स इंडिया योजनेचा शुभारंभ
                              राज्यातील यंत्रमागांसाठी वीज दर सवलतीसंदर्भात योजनेची आखणी
     सौर उर्जेचा अधिकाधिक वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन- मुख्यमंत्री
----------------------------
   यंत्रमाग क्षेत्राला उर्जितावस्था देणारी व्यापक योजना- स्मृती इराणी

ठाणे दि १: देशातील यंत्रमाग क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या पॉवरटेक्स इंडिया या सर्वात मोठ्या योजनेमुळे वस्त्रोद्योगाला सोन्याचे दिवस येतील अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील यंत्रमागाला वीज दरातील सवलत वाढविण्यासाठी योजना आखली आहे अशी माहिती दिली. ते आज यंत्रमाग उद्योगासाठी आखलेल्या पॉवरटेक्स इंडिया या देशव्यापी योजनेच्या शुभारंभप्रसंगी भिवंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या योजनेची वैशिष्ट्ये सांगून यामुळे या उद्योगात संपूर्ण परिवर्तन होईल असे सांगितले.
वस्त्रोद्योग क्षेत्रात नवीन संशोधन-विकासाला चालना, नवीन वस्त्रोद्योग उद्याने, ब्रॅण्डिंग, विपणन, कौशल्य विकास, गुंतवणूक, विविध सवलती, कामगारांसाठी कल्याणकारी योजना आदींचा या देशव्यापी योजनेत समावेश आहे  
यंत्रमाग क्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग विभागाने तयार केलेली ही योजना देशात नवा इतिहास रचेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, याची सुरुवात भिवंडीसारख्या पॉवरलुम कॅपिटलपासून होते आहे ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. फार पूर्वीपासून भिवंडीत हातमागास सुरुवात झाली, त्यानंतर पॉवरलूम सुरु झाले. आज संपूर्ण देशातील ४० टक्के पॉवरलूमचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होते. मेक ईन इंडियाला अनेक वर्षांपासून जिवंत ठेऊन लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम ज्या क्षेत्राने केले त्याला संजीवनी देऊन पंतप्रधानांनी एक मोठे पाऊल उचलले आहे.
यंत्रमागधारकांची वीज दरात अधिक सबसिडी देण्याची मागणी आहे. यासंदर्भात सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने काही घोषणा करता येणार नाही. यापूर्वी १००० कोटींची वीज सबसिडी आमच्या सरकारने नुकतीच १५०० कोटी केली आहे. म्हणजे जवळजवळ ५० टक्के वाढ यात केली असून यासंदर्भात एका योजनेवर आम्ही काम करीत असून लवकरच त्यातील निर्णयांविषयी जाहीर करण्यात येईल.
यंत्रमागधारकांना सौर उर्जा वापरासाठी अधिक सबसिडी
सौर उर्जेविषयी पॉवरटेक्स इंडिया योजनेत भरीव तरतूद आणि प्रोत्साहन दिलेले आहे याचाच संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, यंत्रमागधारकांनी सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. याच्या खर्चात पुढील २५ वर्षे तरी वाढ होणार नाही त्यामुळे एकूणच उत्पादन खर्चही कमी होईल. केंद्र सरकारने या योजनेत ५० टक्के सबसिडी दिली आहे. मात्र राज्य सरकार उर्वरित ५० टक्यांच्या बाबतीत अंतर्गत आणखी सबसिडी देता येते का ते निश्चितपणे पाहील अशी मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले. महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरणास देखील याबाबत आपल्याला मदत करण्याविषयी सांगण्यात येईल.
भिवंडीतील रस्ते, पार्किंगचे नियोजन हवे
भिवंडी हे हातमाग आणि यंत्रमागाचे मोठे केंद्र असल्याने याठिकाणी शहर विकास अधिक नियोजनबध्द रीतीने होणे गरजेचे आहे, येथील रस्ते अधिक चांगले हवेत, पार्किंगची व्यवस्था चांगली हवी , यादृष्टीने पालिका आयुक्तांनी नियोजन तयार करावे, यासाठी अनुदान दिले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. पॉवरलूम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी देखील लक्ष घालावे तसेच सोशल सेक्युरिटीची योजना तयार करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.
योजनेमुळे यंत्रमागात क्रांती- स्मृती इराणी
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, या नव्या क्रांतिकारी योजनेत आम्ही बऱ्याच नव्या आणि आवश्यक बाबींचा समवेश केला आहे. यंत्रमागाचा दर्जा वाढविताना देण्यात येणारी सबसिडी ३० टक्यांनी वाढविली आहे, ग्रुप वर्क शेड या योजनेत कामगारांसाठी विश्रांती घेण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था असेल, आता ११ जण एकत्र येऊन यार्न बँक स्थापन करु शकतात. अशी बँक आता ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही अशा व्यक्ती देखील स्थापन करु शकतील. यासाठीची गेरेंटी कमी करून २५ टक्के केली आहे, यात कॉमन सर्व्हिस सेंटर्स असतील, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देतांना ४ टक्के इतक्या कमी व्याज दराने परतफेड करता येईल १ लाख रुपयांचा मार्जीन मनी देखील शासन देईल. लवकरच पॉवरटेक्स चे एक मोबाईल एप काढण्यात येऊन त्यातून या योजनेची सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल.
पॉवरटेक्स हेल्पलाईन
याप्रसंगी १८००२२२०१७ या पॉवरटेक्स हेल्पलाईनचे तसेच सर्वकष माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेविषयी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी व प्रचार करण्यात येणार असून त्यासाठी प्रसिद्धी रथाला देखील हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या योजनेच्या देशव्यापी शुभारंभाचा कार्यक्रम भिवंडी येथे होत असतांना देशातील ४३ शहरांतील केंद्रांमध्ये देखील या योजनेचा शुभारंभ पार पडला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वस्त्रोद्योग मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजी-कोल्हापूर, सुरत, बेंगलुरू, मालेगाव, बुऱ्हानपूर, तमिळनाडूतील इरोड अशा विविध केंद्रातील मान्यवरांशी संवाद साधला.  
मुख्यमंत्र्यांचे कौतुक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे यासाठी गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत पण या स्मारकासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुकच स्मृती इराणी यांनी केले. त्या म्हणाल्या की, केवळ तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासंदर्भातील अडकलेली कामे सोडविली.  त्यानंतर दिल्लीहून आपण स्वत: विधिमंडळात येऊन सर्वांच्या साक्षीने सन्मानपूर्वक इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे हस्तांतरित केल्याची कागदपत्रे सोपविली असेही त्या म्हणाल्या.
यावेळी खासदार कपिल पाटील यांनी देखील आपले विचार मांडले. ते म्हणाले की ३ महिन्यात मंत्री स्मृती इराणी या भिवंडी येथे दोन वेळा आल्या. त्या या क्षेत्रातील कामगारांविषयी अतिशय संवेदनशील असून आम्ही या व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या सर्व सूचनांचा या नव्या योजनेत समावेश आहे.  प्रारंभी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आमदार महेश चौघुले, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसान कथोरे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, भिवंडी मनपा आयुक्त योगेश म्हसे आदींची उपस्थिती होती.