Wednesday 10 August 2016

आदिवासींच्या पारंपारिक कलांना शासनाचे प्रोत्साहन

आदिवासींच्या पारंपारिक कलांना शासनाचे प्रोत्साहन

            आदिवासींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.  त्यामध्ये त्यांच्या संस्कृतीचेही जतन होते.  आदिवासींच्या हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने खालील योजना सुरु केल्या आहेत.

           आदिवासी हस्तकला प्रदर्शन

आदिवासी हस्तकला वस्तुंना नागरी भागात मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे दुर्गम भागात राहणारे आदिवासी व नागरी भागातील ग्राहक यांना एकत्रित आणून आदिवासींनी हस्तकलेने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शित करुन त्यांच्या विक्रीव्दारे या कलाकारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेंतर्गत प्रदर्शनात भाग घेणा-या आदिवासी हस्तकलाकारांना जाण्या-येण्याचा खर्च, प्रदर्शन काळातील भत्ता, त्यांनी तयार केलेल्या वस्तुंचा प्रदर्शन स्थळापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च अर्थ सहाय्याच्या स्वरुपात देण्यात येतो. त्याचप्रमाणे प्रदर्शनाच्या व्यवस्थापनाचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात येतो.
पात्रता : हस्तकलाकार आदिवासी असला पाहिजे,  त्याने प्रदर्शनात भाग घेण्याची तयारी दाखविली पाहिजे.

          आदिवासी पारंपारिक नृत्यस्पर्धा

आदिवासी जमातीनुरूप नृत्यांचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. आदिवासींची ही स्वत:ची संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने व या नृत्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत विविध जमातींच्या नृत्य पथकांच्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धाकरिता नृत्य कलाकारांना त्यांच्या गावापासून स्पर्धाच्या गावापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च, हजेरी भत्ता, तसेच पारंपारिक वेषभूषा व वाद्यांसाठी अनुदान देण्यात येते. तसेच स्पर्धा आयोजनाचा खर्चही शासनाकडून केला जातो.

वारली चित्रकला स्पर्धा योजना

ठाणे जिल्हयातील वारली या अनुसूचित जमातीच्या पारंपारिक भित्ती चित्रांना व त्यांच्या चित्रकलेस जगभर मान्यता मिळालेली आहे. या चित्रकलेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रौढ गट व शालेय गट असे दोन करुन दरवर्षी स्पर्धा घेण्यात येतात व त्यातील गुणवत्तेनुसार येणा-या पहिल्या ३१ निवडक चित्रांना बक्षिसे देण्यात येतात.

पात्रता : स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकास वारली चित्रकला येत असावी.


या योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment