Sunday 14 August 2016


सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर लॅब

 

       नवी मुंबई,दि.15:- माहिती तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामुळे सायबर गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करण्यासाठी सायबर लॅब महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले. त्या आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ई-बॅंकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मिडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरुन गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जात आहेत, या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार आज नवी मुंबईत सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे व महिला अत्याचार प्रतिबंध) ब्रिजेश सिंह यांच्या अधिपत्याखाली सायबर सुरक्षा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे. या सायबर प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून पीडबल्युसी ही संस्था काम पाहते. या प्रकल्पांतर्गत अद्ययावत डाटा सेंटर उभारले जाणार असून त्यामुळे फरारी गुन्हेगारांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांची उकल करुन अपराधदोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे शक्य होणार आहे. त्याशिवाय पोलीस अधिकारी, सरकारी वकील, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सायबर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र देखील स्थापन करण्यात आली आहे.

या  कार्यक्रमास आमदार संदिप नाईक, कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.हेमंत नगराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक (कोंकण परिक्षेत्र) श्री. प्रशांत बुरुडे, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, उपआयुक्त (गुन्हे) दिलीप सावंत, उप आयुक्त (महसूल) श्री. भाऊसाहेब दांगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) नितीन कौसडीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (सायबर सेल गुन्हे शाखा) अंकुश खेडकर  व इतर मान्यवर उपस्थित  होते. 



No comments:

Post a Comment