Wednesday 24 August 2016

जलयुक्त शिवार शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प


जलयुक्त शिवार शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प

                                              -प्रा.राम शिंदे

 

       नवी मुंबई,दि.24:- कोकणात चार नदींचे पुनर्रजीवन, शेततळे आणि वळण बंधाराच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सर्वांसाठी पाणी आणि टंचाईमुक्त महाराष्ट्र असे राज्यात परिवर्तन होणार आहे असे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, कोकण भवन नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

जाणवली (सिंधुदूर्ग), अर्जूना जगबुडी (रत्नागिरी) आणि गांधारी (रायगड) या नद्यांचे संपूर्ण पुर्नजीवन बाबत लवकरच आदेश काढण्यात येतील. कोकणातील शेततळे देण्याबाबत शासन विचार करीत असून कोकण कृषि विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून या बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. वळण बंधा-यांच्या माध्यामातून पाणी अडवण्यावरही भर दिला जाईल.

अभियांनार्गत राज्यात सन 2015-16 मधील गावांमध्ये 2 लाख 14 हजार 286 कामे पूर्ण करण्यात आली असून  15 हजार 304 कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2016-17 मध्ये 43 हजार 545 कामे पूर्ण करण्यात आली असून 17 हजार 121 कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सन 2015-16 मधील गावांमध्ये आतापर्यंत 11 लाख 61 हजार 626 टीएमसी इतकी पाणीसाठयाची क्षमता निर्माण झालेली असून याद्वारे पिकांना 2 संरक्षित  सिंचन दिल्यास सुमारे 6 लक्ष हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होणार आहे.नरेगा अंतर्गत  कोकण विभागात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत आहे. सन 2016-2017 मध्ये 136 गावांची निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या गावांमध्ये आतापर्यंत 357 कामे पूर्ण झाली असून 31 कामे प्रगतीपथावर आहेत. या गावांमधील सर्व कामे मार्च 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती  प्रा.शिंदे यांनी यावेळी दिली.

          लोकसहभाग हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असून लोकसहभागाद्वारे आजपर्यंत राज्यात जवळपास 500 कोटी रुपयांची कामे करण्यात आलेली आहेत. प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण/रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलसंधारण अभियान हे आता एक लोक चळवळ झाली आहे.

          कोकणामध्ये चिरेखाणी दुरुस्ती करून पाणी साठवण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. सिंधुदूर्गमध्ये याबाबत पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. कोकणातील गावांना शेततळे देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल.  कोकणामध्ये वळण बंधा-याच्या माध्यमातून पाणी अडवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोकण विभागातील सर्व जिल्हयांनी कालबध्द कार्यक्रम आखून मार्च 2017 पूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिका-यांना दिले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री, दीपक केसरकर, जलसंधारण विभागाचे सचिव डॉ.पुरुषोत्तम भापकर, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, उपायुक्त (रोहयो) अरुण अभंग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment